प्लास्टिकचा वापर टाळा – कागदी फुले वापरा
पर्यावरणाचा हानिकारक परिणाम टाळा

✍️ लेखिका – सविता संजय बारंगळे

आला गौरी गणपतीचा सण, चला करू या त्यांच्या स्वागताची तयारी. यासाठी जि.प. शाळा धनवडेवाडी, दरे बु. येथे मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फुलांचा बाजार भरविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख सौ. मालन गुजर मॅडम यांनी केले. शालेय परिसरातील महिला, पालक वर्ग आणि तरुण मुलींनी गर्दी करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. यात फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि शाळेला फायदा झाला.

शाळेत नियोजन करून दोन-तीन दिवस दररोज एक तास फुले बनविली जात होती. शाळेतील कांचन सनगर मॅडम व सविता बारंगळे मॅडम यांनी मुलांना चार प्रकारची फुले बनविण्यास शिकविले. त्यासाठी लागणारे साहित्य – क्रेप पेपर, टेंटेड पेपर, कार्डशीट, गोठीव कागद – शाळेने उपलब्ध करून दिले. कात्री व गम मुलांना आणण्यास सांगितले.

मुलांना सुरूवातीला वर्तमानपत्रावर फुले बनवायला शिकवले. त्यामुळे कात्रीने विविध आकार चांगल्या प्रकारे कापायला येऊ लागले. मोजपट्टीचा वापर करून आवश्यक प्रमाणात पट्ट्या कापल्या. याचा सराव नंतर रंगीत कागदावर केला. त्यामुळे सुबक आकाराची सुंदर रंगीबेरंगी फुले बनविली गेली. शनिवारी, दप्तरविना शाळा या दिवशी मुलांनी खूप फुले बनविली. फुले बनवित असताना मुले गोल, त्रिकोण, शंकू, चौकोन, आयत अशा विविध आकारावर चर्चा करत होती. मोजपट्टी वापरून पट्ट्या सेटीमीटरमध्ये कापत होती.

फुले बनविताना मुलांना भूमितीचे शिक्षणही सहज मिळत होते. मनात शंका आली असती तर विविध आकार काढायला लावले असते, तर कदाचित कंटाळा आला असता. मुलांनीच सुचवले, “आपण ही फुले विक्रीस ठेवू या.”

स्वतः सुंदर केलेल्या फुलांचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. आपल्या आईला आनंदाने ही फुले दाखवत होते. फुलांची किंमत कमीच होती – ५-५ रुपये. फुले शिल्लक राहिली नाहीत; छान विक्री झाली.

शेवटी सगळ्यांनी पैसे मोजून दिलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पैशाचा व्यवहार कळला आणि प्रत्यक्ष अध्ययन अनुभव मिळाला. यात खर्च सगळा जाऊन २०५ रुपयांचा फायदा झाला, जो मुलांच्या कलेच्या विकासासाठी साहित्य आणण्यासाठी राखून ठेवण्यात आला.

शालेय अभ्यासाबरोबर व्यवसाय प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे मला वाटते. गौरी गणपतीच्या सणांमध्ये नष्ट न होणाऱ्या कचऱ्याची समस्या मोठी असते. कागदी फुले असल्यामुळे ही समस्या निर्माण होत नाही. या मुल्याची रुजवणूक लहान वयात मुलांमध्ये झाली.

कलेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देणारा छोटासा उपक्रम मुलांना खूप काही शिकवून गेला. आमच्या या उपक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी सौ. जयश्री शिंगाडे मॅडम व केंद्रप्रमुख सौ. मालन गुजर मॅडम यांनी खूप मोठी प्रेरणा दिली व कौतुकाची शाबासकी दिली. तसेच आमचे ग्रामस्थ व शिक्षकवर्ग यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. त्यामुळे सनगर मॅडम व बारंगळे मॅडम यांना अधिक कार्य करण्याची बळकटी निर्माण झाली.



सौ. सविता संजय बारंगळे
जि.प. शाळा धनवडेवाडी, दरे बु.

Scroll to Top