२४/१२/२०१६ या तारखेला केलेले सर्वेक्षण .

✍️ लेखिका – सविता संजय बारंगळे

पाटखळमाथा या गावच्या रस्त्याच्या दुतर्फा या दिवसात खूप टोळ्या येतात. त्यांचे सर्वेक्षण वासोळे शाळेला दरवर्षी करावे लागते. टोळीचा सुगावा लागला होता. आज शनिवार असल्यामुळे शिंगटे मॅडम आणि मी सकाळीच टोळीला भेट दिली. सकाळी माणसे भेटतील या हिशोबाने, बायकांची आवरा-आवर चाललेली, तर पुरूष मंडळी सहाच्या सुमारास कामाला. छोटी मुले पाहून चक्रावून गेलो. ही मुले शाळेत कशी आणायची, हा विचार मनात येत होता.

मुलांना एका ठिकाणी गोळा केले. शिंगटे मॅडमनी मुलांची नावे लिहिली. ती मुले त्यांच्या गावी शाळेत जात होती आणि इयत्ता त्यांनी सांगितली. दोघीनी पर्समध्ये हात घातला आणि जेवढी चॉकलेट सापडली ती मुलांना दिली.

मुलांना एकत्र बसवून घेतले आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. एका मुलीने खूप छान वाचून दाखवले. शिंगटे मॅडमनी मुलांना छान गोष्टी सांगितल्या आणि त्यांना शाळेत येण्यास सांगितले. तेव्हा मुले विचार न करता बोलली, “मॅडम, काम कोण करणार? या छोट्या मुलींना कोण सांभाळणार? या कोपीतील साहित्यावर, शेरड्यांवर कोण लक्ष ठेवणार?” बापरे! केवढी जबाबदारी या मुलांवर! ही मुले १ ते ५ वीच्या इयत्तेतली होती.

मुले गोळा करताना निरीक्षण केले असता, ही चिमुकली मुले किती कामे करत होती – पाणी भरणे, धुणभांडी, साहित्य लावणे, जळणगोळा करणे. एक छोटा मुलगा तर आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन हातात मोबाईलवर गाणी ऐकत फिरत होता. मुले जबाबदाऱ्या सहज उचलत होती, पण पालक…

शाळेत पाठवण्यासाठी विनंती केली. मुलांना कपडे, वही, पुस्तके, खाऊ आणि जेवण देण्याची व्यवस्था सुचवली. पण पालक म्हणाले, “अहो मॅडम, या पोराच्या बापाला काम होत नाही. तो ऊस पटापटा तोडतो. काय करणार? कष्ट आमच्या आयुष्याला पुजले आहे. मुलांना शाळेत पाठवा, त्यांच्या वाटेवर अडथळे नको.” या पालकांचे विचार खोलवर बदलणे आवश्यक आहे, कारण त्यांना वेळ नसतो. कामावर जाण्याची घाई आणि या लोक बीड, उस्मानाबाद, धुळे या जिल्ह्यातून आलेली.

या निरागस मुलांकडे पाहिले की वाटते, किती लहान वयात यांच्यावर जबाबदारी पडलेली आहे; अवेळीच प्रौढ झालेली आहेत. पालकांची मानसिकता बदलली नाही, त्यामुळे मुलांचे बालपण प्रभावित होत आहे. मुलांचे खेळण्याचे, बागडण्याचे आणि शिकण्याचे वय आहे, पण त्यांना बालपणाच्या आनंदापेक्षा जबाबदारी सांभाळावी लागत आहे. ही जाणीव मुलांना नाही की त्यांचे बालपण कोमेजून जात आहे. हीच पिढी मोठी झाली आणि आपल्या मुलांकडून हीच अपेक्षा ठेवते.

खरेतर शासकीय पातळीवर काही हालचाली झाल्या, जशा नोटबंदी, बँकेत खाती काढणे, कॅशलेस व्यवहार, पण या मुलांच्या शिक्षणासाठी काही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आमच्या स्तरावर शक्य तितके प्रयत्न केले जातात, पण ते तोकडे पडतात.

तो सुदिन कधी येईल आणि एकही मुलं शाळेबाहेर राहणार नाही, तो येणारा काळच ठरवेल.

जय शिक्षण! जय संगोपन! जय बालकांचा विकास – तोच भारताचा विकास!

सविता बारंगळे
वासोळे शाळा

Scroll to Top